मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाने तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. अनलॉकमुळे वाहतूक पूर्वपदावर येत असून इंधन मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रती बॅरल या तीन वर्षांच्या उच्चांकी स्तरावर गेला आहे. दरम्यान, आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज देशभरात इंधन दर स्थिर ठेवले आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.४४ डॉलरने वधारला आणि ७३.३० डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.४३ डॉलरने वधारला आणि ७१.३१ डॉलर प्रती बॅरलवर बंद झाला होता. कच्च्या तेलाचा मागील तीन वर्षांतील सर्वोच्च दर आहे. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०२.५८ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९७.६९ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.३४ रुपये आहे. आज मुंबईत ९४.७० रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८७.२८ रुपये आहे. चेन्नईत ९१.९२ रुपये आणि कोलकात्यात ९०.१२ रुपये डिझेलचा भाव आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून नजीकच्या काळात इंधन दरवाढ सुरुच ठेवण्याची शक्यता आहे. मागील दिड महिन्यात कंपन्यांनी २५ वेळा इंधन दरवाढ केली आहे. यात पेट्रोल सहा रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये ६.५० रुपयांनी वाढले आहे. सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात २९ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ केली होती तर रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल २९ पैसे आणि डिझेलमध्ये २८ पैशांची वाढ केली होती. शनिवारी कंपन्यांनी पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २३ पैशांनी वाढवले होते.