
काठमांडू: नेपाळमध्ये मुसळधार पावसानंतर पुराने थैमान घातले आहे. मध्य नेपाळमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५० हून अधिक बेपत्ता आहेत. महापुराच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काही ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यामुळे अडचणींना सामना करावा लागत आहे. मागील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसामुळे मध्य नेपाळमधील सिंधुपालचोकमधील मेलम्ची नदीला पूर आला. मृत्यू झालेले सातही जण याच भागातील आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मृतदेह सापडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५० हून अधिकजण बेपत्ता आहेत. यामध्ये मेलम्ची जलपुरवठा प्रकल्पात काम करणारे कामगार-कर्मचारी आहेत. वाचा: आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री शेर बहादूर तमांग यांनी सांगितले की, मेलम्ची आणि इंद्रावती नदीला पूर आला आहे. त्यामध्ये ५० जण बेपत्ता आहेत. पुरामुळे टिम्बू बाजार, चनाउत बाजार, तालामारंग बाजार आणि मेलम्ची बाजारातील जलपुरवठा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नुकसानही झाले आहे. सिंधुपालचोकमध्ये दोन क्राँकीट पूल आणि पाच ते सहा सस्पेंशन पूलही कोसळले आहेत. शेतीसह मत्स्य पालनाच्या ठिकाणांचेही मोठे नुकसान झाले आहे. मेलम्ची नदीच्या किनारी असलेल्या गावांमध्ये जवळपास ३०० झोपडी घरे वाहून गेली आहेत. तर, लामजुंग जिल्ह्यात जवळपास १५ घरे वाहून गेली आहेत. आणखी २०० घरांना धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाद्वारे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.