धक्कादायक! राज्यात अकरा हजारांहून अधिक करोना मृत्यू लपविले? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 10, 2021

धक्कादायक! राज्यात अकरा हजारांहून अधिक करोना मृत्यू लपविले?

https://ift.tt/3gicm3I
पुणे : करोनाने आतापर्यंत महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक जणांचे मृत्यू झाले असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिला आहे. नोंदी न झाल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नोंदी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार असून, आतापर्यंत या बाबीत एवढा निष्काळजीपणा का दाखविला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य खात्याकडून बाधितांसह मृतांची आकडेवारी दररोज जाहीर करण्यात येते. आरोग्यमंत्री यांनी स्वत: अनेकदा मृत्यूदराचे प्रमाण जाहीरपणे सांगितले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्ह रुग्णासंह मृतांच्या एकूण आकडेवारीची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हाती आली आहे. १८ सप्टेंबर २०२० ते २० मे २०२१ या काळात जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेने राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्याने दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे या माहितीतून समोर आले आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखविण्यात आल्याचे दिसते. १८ सप्टेंबर ते २० मे या काळात राज्यात ११ हजार ६१७ रुग्णांचा करोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद अद्याप पोर्टलवर झालेली नाही. राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी खात्यातील अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबत संदेश पाठविला असून, नोंद नसलेल्या मृतांच्या आकडेवारीबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना 'अलर्ट' केले आहे. 'आतापर्यंतच्या रुग्णसंख्येबरोबरच गेल्या ४८ तासांत झालेल्या मृत्यूंपैकी काही मृत्यू आणि जुन्या मृत्यूंच्या नोंदी अशा आतापर्यंत दाखवत होतो. ते आता थांबवा. संबंधित जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील 'अनरिपोर्टेड डेथ'च्या राहिलेल्या नोंदी १० जूनपर्यंत तत्काळ पोर्टलवर अद्ययावत कराव्यात. काही मृत्यू नोंदी राहिल्यास त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्यात येईल,' अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधल्याचेही त्यांनी संदेशात म्हटले आहे. या संदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'ने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वृत्त फेटाळले. मृतांची आकडेवारी लपविण्यात आली नाही. आम्ही जबाबदारीने काम करीत आहोत. आम्ही विभागातील अधिकाऱ्यांना पोर्टल दररोज अपडेट्स करण्याबाबत विचारणा करतो. या बाबीमुळे सनसनाटी पसरवू नका. डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव आरोग्य विभाग ही पाहा नोंद नसलेल्या मृत्यूची संख्या विभागाचे नाव मृत्यू संख्येतील फरक मुंबई १६०४ नाशिक ४२७ पुणे ५७६८ कोल्हापूर ४१ औरंगाबाद १०८६ लातूर ८१ अकोला ८३५ नागपूर १८९३ अन्य राज्यांतील मृत्यू ११८ एकूण ११,६१७ पुणे विभाग पुणे जिल्हा ५०२९ सातारा जिल्हा ६६२ सोलापूर जिल्हा ७७ मटा भूमिका मृत्यू का लपविले? महाराष्ट्रामध्ये करोनाबाबतच्या आकडेवारीमध्ये कोणताही फेरफार केला जात नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जाहीरपणे सांगितले होते. असे असतानाही काही मृत्यूंची नोंद का गेली नाही, याचा खुलासा आरोग्य विभागाने करणे आवश्यक आहे. या आकडेवारीत सुधारणा करण्याची गरज राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना का वाटली नाही, याची कारणे जनतेला मिळायला हवीत. झालेले मृत्यू आणि जाहीर होणारी आकडेवारी यामध्ये आता पुढील काही दिवस तफावत दिसेल. या सर्व गोंधळाला कोण जबाबदार आहे, याची चौकशी खुद्द मुख्यमंत्र्यांनी करावी. बाधित रुग्णसंख्येबाबतही अशी तफावत असू शकते; त्यामुळे त्याबाबतही माहिती घेणे गरजेचे आहे.