MIW vs GGW : हरमनप्रीतची एकाकी झुंज अपयशी, गुजरातची मुंबईवर 11 धावांनी मात, प्लेऑफमध्ये धडक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 31, 2026

MIW vs GGW : हरमनप्रीतची एकाकी झुंज अपयशी, गुजरातची मुंबईवर 11 धावांनी मात, प्लेऑफमध्ये धडक

MIW vs GGW : हरमनप्रीतची एकाकी झुंज अपयशी, गुजरातची मुंबईवर 11 धावांनी मात, प्लेऑफमध्ये धडक

गुजरात जायंट्सने अखेर अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. गुजरातने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील (WPL 2026) 19 व्या मोसमात आज 30 जानेवारीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केली. गुजरातचा हा या स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स विरुद्धचा पहिलावहिला विजय ठरला आहे. गुजरातने मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग आणि एकूण 8 पराभवानंतर पहिलावहिला विजय साकारला आहे. गुजरातने बडोद्यातील कोतांबीमधील बीसीए स्टेडियममध्ये मुंबईवर 11 धावांनी मात केली. गुजरातने या विजयासह प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. तसेच गुजरातने मुंबई विरुद्ध या विजयासह गेल्या पराभवाचीही परतफेड केली.

गुजरातने या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र त्यानंतरही गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 167 धावांपर्यंत मजल मारली. या विजयी धावांचा पाठलाग करताना कर्णधार हरमनप्रीत कौर हीने अर्धशतक झळकावलं. मात्र हरमनप्रीतला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला अवघ्या काही धावांनी सामना गमवावा लागला. प्लेऑफच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा होता. त्यामुळे दोन्ही संघांत चुरस पाहायला मिळणार, हे निश्चित होतं. मुंबई या सामन्यात विजयापासून अवघ्या 11 धावांनी दूर राहिली. गुजरातसमोर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 156 धावाच करता आल्या.

कॅप्टन हरमनप्रीत कौरची खेळी व्यर्थ

कॅप्टन हरमनप्रीतने मुंबईसाठी सर्वाधिक आणि नाबाद 82 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने 48 चेंडूंच्या या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार लगावले. मात्र हरमनप्रीत मुंबईला विजयी करण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरली. मुंबईसाठी हरमनप्रीत व्यतिरिक्त ओपनर सजीवन सजना हीने 26 धावा केल्या. तर एमेलिया केर हीने 20 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 धावाही करता आल्या नाहीत.

गुजरातकडून एकूण 7 जणींनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 गोलंदाज यशस्वी ठरले. जॉर्जिया वारहॅम आणि सोफी डीव्हाईन या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.