
मुंबई : देशभरात आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. आज पेट्रोल २७ पैसे आणि डिझेलमध्ये २८ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. मुंबईत पेट्रोल १०३ रुपये झाले आहे. एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्या दरवाढीचा शॉक देत आहेत.इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले असून देशभरात सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.०८ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.९३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.१४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.८४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये ९६.३५ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. आज कंपन्यांनी डिझेलमध्ये देखील २८ पैशांची वाढ केली आहे. यामुळे आज मुंबईत डिझेलचा भाव ९५.१४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८७.६९ रुपये आहे. चेन्नईत ९२.३१ रुपये आणि कोलकात्यात ९०.५४ रुपये डिझेलचा भाव आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. आतापर्यंत कंपन्यांनी २७ वेळा दरवाढ केली आहे. त्यात पेट्रोल ६.६१ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये याच काळात ६.९१ रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत गुरुवारी घसरण पाहायला मिळाली. डॉलरमध्ये तेजी आणि ट्रेझरी यिल्ड वाढल्याने कमॉडिटी गुंतवणूकदारांनी तेलाची विक्री केली. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाची मागणी वाढली होती. परिणामी तेलाचा भाव मागील तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेला होता. गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात तेलाचा भाव कमी झाला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव १.३१ डॉलरने कमी झाला आणि तो ७३.०८ डॉलर प्रती बॅरल झाला. टेक्सासमध्ये डब्ल्युटीआय क्रूडचा भाव १.११ डॉलरने घसरून ७१.०४ डॉलर प्रती बॅरल झाला.