
म. टा. खास प्रतिनिधी, माजी गृहमंत्री यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप केल्यामुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त आणि एका निरीक्षकाची बदली सशस्त्र विभागात करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार २२ जुलैला मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील, निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सुनील जैन आणि संजय पुनमिया हे दोघे अटकेत असून मुंबई पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासाकरिता एसआयटीची स्थापना केली आहे. पोलिस उपायुक्त निमीत गोयल या एसआयटीचे प्रमुख असून सहायक पोलिस आयुक्त एम. एच. मुजावर हे तपास अधिकारी आहेत. पोलिस निरीक्षक प्रिनम परब, सचिन पुराणिक, विनय घोरपडे, महेंद्र पाटील, विशाल गायकवाड यांची सहायक तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यात एकामागून एक गुन्हे दाखल होत असल्याने परमबीर सिंह अडचणीत आले असून याप्रकरणात एसआयटी तयार करण्यात आल्याने गुन्ह्यात नावे असलेल्या इतर अधिकाऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यामुळे गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे आणि पोलिस निरीक्षक आशा कोरके यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना अशा परिस्थिती नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत ठेवणे प्रशासकीय दृष्टीकोनातून योग्य ठरणार नसल्याने त्यांची बदली केली जात असल्याचे आपल्या आदेशात पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.