'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पुढील आठवड्यात ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निवड व्हावी, म्हणून काँग्रेस पक्ष आग्रही असला, तरी आघाडीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मतभिन्नता असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष निवडीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. सध्या करोनाचे संकट कायम आहे. करोनामुळे अधिवेशन दोन दिवसांचे होईल. अधिवेशनाआधी आमदारांची करोना चाचणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड पुढे ढकलता येईल किंवा कसे, यावरही बैठकीत खल झाला. अधिवेशनातच अध्यक्षांची निवड मुंबई : मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर २०२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. '१२ आमदारांच्या पत्राचे काय झाले?' पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तथापि, राज्यपालांना १२ नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरील व्यक्तींनी पदाचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, असा चिमटा पटोले यांनी काढला. 'बहुमतापेक्षा जास्त मते मिळतील' मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे करोना चाचणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल. आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा विश्वास कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी व्यक्त केला आहे. 'राज्यपालांनी विषय निकाली काढावा' राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करावी असे सूचित करीत आहेत. मात्र, विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. तो पण विषय प्रलंबित आहे. राज्यपालांनी हा विषय निकाली काढला, तर विधान परिषदेच्या सभागृहातील बारा आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील. आमचा आग्रह वारंवार राहिला आहे, याची आठवणही मलिक यांनी राज्यपालांना बुधवारी पुन्हा एकदा करून दिली आहे.