म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काय केले, अशी भाजपची मंडळी आम्हाला विचारतात. पण देशात पेट्रोलचा दर ७० रुपये प्रति लिटर व्हायला ७० वर्षे लागली. मागील सात वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोलचे दर १०७ रुपये प्रति लिटरवर आणून ठेवले. यावर भाजपच्या नेत्यांनी उत्तर द्यावे', असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी रविवारी लगावला. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ, वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निषेध आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंद्रप्रस्थ मॉल, बोरिवली पश्चिम ते एन. एल. कॉलेज मालाड पश्चिम दरम्यान रविवारी सायकल रॅली काढली होती. त्यावेळी ते बोलत होते. 'आमचे आंदोलन ही गरिबांची लढाई आहे. गरिबांचा या केंद्र सरकार विरोधात रोष आहे. या लढाईत कितीही अडचणी आल्या. कितीही अपघात झाले तरी ते आम्हाला चालेल, पण गरिबांचा हा लढा लढत राहणार. गरिबांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम करीत राहणार', असा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला. सायकल रॅलीत मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अजंता यादव, भूषण पाटील, संदेश कोंडविलकर, सदा चव्हाण, कमलेश शेट्टी, अशोक सुत्राळे, प्रशांत गायकवाड, राजपती यादव, प्रगती राणे, मनोज नायर, राजेश निर्मल आदी सहभागी झाले होते.