नाशिकः केंद्रीय मंत्री (Narayan Rane) यांना महाड येथील कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी नाशिक पोलिसांनी () राणेंनी नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य व आणि त्यावरुन राणे यांना झालेली अटक यावरुन राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. नाशिक राणे- ठाकरे वादाचे केंद्र ठरले होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी थेट राणेंच्या अटकेचे आदेश काढले आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्या अटकेसाठी मंगळवारी सकाळीच पोलिसांचे एक पथक चिपळूणकडे रवाना झाले होते. त्यानंतर राणे यांना यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली. त्यानंतर रायगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या राणे यांना महाडला नेण्यात आले. तिथे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने रात्री उशिरा राणे यांना जामीन मंजूर केला. नारायण राणेंना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला असताना नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना दुसरा धक्का दिला आहे. नाशिक पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून २ सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राणे नेमके काय बोलले? जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे सोमवारी महाडमध्ये होते. तेथे पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुढे वादंग उद्भवला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ना... की हीरक महोत्सव? अशी विचारणा केली होती,’ असे खास आपल्या शैलीत साभिनय दाखवताना राणे यांची जीभ घसरली. ‘मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी... सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे,’ असे उद्गार राणे यांनी काढले. राणे यांची ती भाषा, ते उद्गार काही वेळातच सर्वश्रुत झाले आणि वाद उसळला.