लढाईला तोंड फुटले...; राणेंविरोधात शिवसैनिक इतके आक्रमक का झाले? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 25, 2021

लढाईला तोंड फुटले...; राणेंविरोधात शिवसैनिक इतके आक्रमक का झाले?

https://ift.tt/2WriIaU
sanjay.vhanmane@timesgroup.com@sanjayvMTमुंबई : शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर सातत्याने शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे माजी मुख्यमंत्री आणि आताचे यांच्या विरोधात शिवसेनेने आजवर फारसा आक्रमक पवित्रा घेतला नव्हता. राणे यांना विनाकारण महत्त्व मिळू नये यासाठीचाच हा प्रयत्न होता. मात्र नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे आणि मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेला डिवचण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणे यामुळे सेनेचा पवित्रा आता बदलला आहे, असे दिसते. येथून पुढच्या काळात राणे आणि भाजप यांच्याविरोधात दोन हात करण्याची मोकळीकच यानिमित्ताने शिवसेना नेतृत्वाने शिवसैनिकांना दिल्याचे समजले जात आहे... लढाईला तोंड फुटले आहे... शिवसेनेमध्ये होत असलेली घुसमट सहन न होऊन राणे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला, त्यानंतर ते सातत्याने सेनेवर आणि विशेषत उद्धव ठाकरे यांच्यावर कायमच प्रखर टीका करत राहिले. मुख्यमंत्री तसेच मंत्रिपदाचा अनुभव असणाऱ्या राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नसल्याबाबतही नेहमीच हिणवले आहे. महाविकास आघाडीचे सरकार येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राणे यांच्या 'रागाचा पारा' अधिकच चढल्याचे आणि टीकेला टोक आल्याचे पाहायला मिळाले. सत्तेत सोबत असतानाही शिवसेना सतत अडवणुकीचे धोरण अवलंबत होती, तेव्हा सेनेवर अंकुश ठेवण्यासाठीच राणे यांना राज्यसभेची उमेदवारी देत राजकारणाचा वेगळा रस्ता भाजपने धरला. भाजपच्या दुर्दैवाने राज्यात पक्षाची सत्ता पुन्हा आली नाही, उलट शिवसेनेकडे सत्तेची सूत्रे एकवटली. तेव्हा याचा वचपा काढण्यासाठी भाजपने शिवसेनेचे 'काळीज' असलेली मुंबई महापालिका त्यांच्या ताब्यातून घेण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच गोष्टींचा वापर प्रचारात होणार असून राणे यांच्या खांद्यावरून शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडण्यातून त्याची सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांचा घटनाक्रम तेच सांगतो. निवडणूक प्रचाराचा काळ सोडला तर शिवसेना राणेंवर आरोप करण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे आजवर टाळले होते. मात्र कॅबिनेट मंत्रिपद देऊन भाजपने राणे यांच्या पाठीशी बळ उभे केले असल्याचे लक्षात घेऊन शिवसेना नेतृत्वाने राणे यांना शिंगावर घेण्याचे ठरवले आहे, असा या घडामोडींचा निष्कर्ष काढता येईल. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवा सेनाप्रमुख वरुण सरदेसाई यांनी जुहू येथील राणे यांच्या बंगल्यासमोर जाऊन थेट राणे कुटुंबीयांनाच दिलेले आव्हान यातूनही शिवसेनेची पुढची रणनीती अधोरेखित होते. एकूणच एरव्ही शिवसैनिकांना रोखून धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन आतापासूनच आक्रमक होण्याचा इशारा यानिमित्ताने दिला असल्याचा तर्क व्यक्त केला जात आहे.