
म. टा. प्रतिनिधी, मुंबई लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना देण्यात आल्याने आता मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीस सज्ज झाली आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण २,९८६ फेऱ्या आज, सोमवारपासून सुरू होणार आहेत. यापैकी मध्य रेल्वेवर १,६८६ आणि पश्चिम रेल्वेवर १,३०० फेऱ्या धावणार आहे. लसधारकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर संभाव्य प्रवाशांची वाढ लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गर्दी नियोजनासाठी फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यातील कठोर निर्बंध शिथिल झाले आहेत. दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पडत असताना, लसीकरणही सुरू आहे. लसधारकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याने गर्दी नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर १,६१२ फेऱ्या धावत होत्या. आता लसधारक प्रवाशांना लोकलप्रवासाची मुभा मिळाल्याने ७४ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील ९५ टक्के लोकलफेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत. करोनापूर्व काळात एकूण १,७७४ फेऱ्या धावत होत्या, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये ९९ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे १,२०१ वरून फेऱ्यांची संख्या १,३०० पर्यंत पोहोचली आहे. करोनापूर्व काळातील एकूण लोकल फेऱ्यांपैकी (१,३६७ फेऱ्या) ९५ टक्के लोकलफेऱ्या सध्या प्रवाशांसाठी धावत असून, राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रवाशांना लोकलप्रवासाची मुभा आहे. प्रवाशांनी प्रवास करताना मास्कचा वापर करावा, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह लसधारकांना लोकलप्रवासाची मुभा मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने दिली आहे. मात्र, अद्याप एक मात्रा घेतलेला गरजू प्रवासी वर्ग लोकलमुभेच्या प्रतीक्षेत आहे.