: प्रदेशाध्यक्ष () हे येत्या ३१ ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत माजी परिवहन सभापती केशव इंगळे आणि शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यात चांगलीच जुंपली. अगदी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या ज्येष्ठ नेत्यांची मजल गेल्याने काँग्रेसचे इतर कार्यकर्ते अवाक् झाले. नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. कॉंग्रेस भवनात मागील तीन दिवसांपासून नियोजनासाठी बैठका सुरू आहेत. शहराध्यक्ष प्रकाश वाले हे दिवसभर काँग्रेस भवनात थांबून नियोजन करत आहेत. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता, माजी परिवहन सभापती केशव इंगळे हे बैठकीत रागाने उठले आणि त्यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावर निशाणा साधत प्रकाश वाले हे आपल्याला बैठकीला बोलावत नाहीत आणि बैठकीत आल्यानंतर बोलू देत नाहीत, असा आरोप केला. तसंच त्यांना अध्यक्षपद सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावेळी इंगळे यांना कांही जणांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद एवढा वाढत गेला की, पक्षाचे हे अनुभवी नेते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत सुद्धा प्रसंग आला. दरम्यान या सगळ्या घटनेमुळे संतापलेल्या प्रकाश वाले यांनी थेट अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, अशी घोषणा आपल्या भाषणात केली. त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी इंगळे यांचा निषेध करत त्यांचं वागणं बरोबर नाही, असं सुनावलं. भटक्या विमुक्त विभागाचे युवक शहराध्यक्ष पवन गायकवाड यांनी तर वाले यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. प्रकाश वाले यांच्याशी संपर्क साधला असता पक्षांतर्गत वाद होता, तो मिटला असून त्याला एवढं महत्व देण्याचे कारण नाही, असं सांगून अधिक बोलणं टाळलं आहे. तरीही स्थानिक नेत्यांच्या या कृतीने काँग्रेस अंतर्गत उफाळलेला हा संघर्ष पक्ष नेतृत्वापर्यंत जाण्याची शक्यता असून याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.