
म. टा. प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील करोनाचा संसर्ग जवळपास नियंत्रणात आला आहे. परिणामी शहर आणि उपनगरातील झोपडपट्टी भागातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या शून्यांवर आली आहे. अंधेरी पूर्व परिसरात मुंबईतील शेवटची ३० प्रतिबंधित क्षेत्रे होती. या भागातील रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने रविवारी ही क्षेत्रे रद्द केली आहेत. मात्र इमारतींमधील करोना संसर्ग काही अंशी कायम असून अद्यापही २६ इमारती व एक हजार २४५ मजले अजून सील आहेत करोनाच्या पहिल्या लाटेत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत, झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली जात होती. ऑगस्ट २०२०पर्यंत ६५० झोपडपट्ट्यांमध्ये दोन हजार ८०० प्रतिबंधित क्षेत्रे होती, तर ३० इमारती सील करण्यात आल्या होत्या. पहिल्या लाटेत करोना नियंत्रणात आल्यानंतर 'आयसीएमआर'च्या नियमावलीनुसार, संपूर्ण इमारत सील करण्याऐवजी संबंधित मजले सील केले जात होते. यादरम्यान, सुमारे एक हजार ३०० मजले सील करण्यात आले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात झोपडपट्ट्यांमध्ये ५४ प्रतिबंधित क्षेत्रे होती. एप्रिल अखेरपर्यंत साथीचा जोर वाढल्याने ती ८० वर पोहोचली होती, तर मे अखेरीस ती ४१ पर्यंत खाली आली होती. त्यामध्ये अंधेरी, जोगेश्वरी आणि कांदिवली परिसरात सर्वाधिक क्षेत्रे होती. जुलैअखेर अंधेरी पूर्व परिसरात ३० क्षेत्रे शिल्लक राहिली होती. पहिल्या लाटेत झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते, तर दुसऱ्या लाटेत सुमारे इमारतींमधून ९० टक्के रुग्ण आढळून येत. रुग्णवाढीनंतर तातडीने संबंधित भागात प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली जाऊन उपाययोजना वाढवल्या जात होत्या. पालिकेने करोनाच्या पहिल्या लाटेपासूनच रुग्ण शोध, तपासणी, विलगीकरण, चाचण्या आणि रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध घेऊन मोहीम सुरू केली. आरोग्य यंत्रणेने मोठ्या मेहनतीने संसर्ग नियंत्रणात आणला. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत प्रतिबंधित क्षेत्रे कमी झाली, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. धारावीत १२ वेळा शून्य रुग्ण करोनाच्या दुसऱ्या लाटेत १ जूनपासून १४ ऑगस्ट २०२१पर्यंत धारावीत बाराव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. १४, १५, २३ जून, ४, ७, १७ जुलै आणि ३, ८, ११, १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी धारावीत एकही रुग्ण आढळलेला नाही. धारावीत सीटी बँक आणि जसलोक रुग्णालयाच्या सहकार्याने पालिकेने २७ जूनपासून विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यात दोन महिन्यांत एक लाख नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सहा हजारांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. इमारतींचे कुलूप कायम झोपडपट्ट्यांमधील करोना नियंत्रणात असला, तरी इमारतींमध्ये अद्याप प्रादुर्भाव आहे. २६ इमारती व एक हजार २४५ इमारतींचे मजले अजून सील आहेत. इमारतींमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यामुळे त्या सील करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ६६ हजार १२८ इमारती सील करण्यात आल्या होत्या. भांडुप, कुर्ला व गोवंडी हे तीन विभाग वगळता पालिकेच्या अन्य २१ विभागांमध्ये करोना रुग्ण आढळल्यामुळे इमारतीचे मजले सील आहेत. कांदिवली दक्षिणमध्ये सर्वाधिक १७५ मजले सील असून अंधेरी पश्चिमेला १४४, मुलुंड ९२, बोरिवली ९०, गोरेगाव, अंधेरी पूर्व, चेंबूर प्रत्येकी ८९, मालाड ८४, ग्रँटरोडमध्ये ७६ मजले सील आहेत.