पत्नीच्या इच्छेविना शारीरिक संबंध बेकायदेशीर नाहीत; कोर्टाचे निरीक्षण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 16, 2021

पत्नीच्या इच्छेविना शारीरिक संबंध बेकायदेशीर नाहीत; कोर्टाचे निरीक्षण

https://ift.tt/3AMgzFy
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : 'पतीने पत्नीच्या इच्छेविना शारीरिक संबंध ठेवले म्हणजे त्याने काही बेकायदेशीर कृत्य केले, असे म्हणता येणार नाही', असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने पतीला नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर करताना नोंदवले. न्यायालयाच्या परवानगीविना महाराष्ट्राबाहेर जायचे नाही, पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करायचे आणि तपास अधिकारी बोलावतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावायची, अशा अटी घालून न्यायालयाने पतीला तसेच त्याच्या नातेवाईकांना अटकेपासून संरक्षण दिले. तक्रारदार महिलेचा गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी विवाह झाला. 'विवाहानंतर पती, त्याचे कुटुंबीय व नातेवाईकांनी मला विविध बंधने घालण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर टोमणे मारून व शिवीगाळ करून माझी छळवणूकही केली. तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणीही केली. विवाहाच्या एक महिन्यानंतर पतीने माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझ्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. २ जानेवारी २०२१ रोजी आम्ही महाबळेश्वरला गेलो असताना तिथेही पतीने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मला बरे वाटत नसल्याने मी डॉक्टरकडे गेले असता, कमरेखालच्या भागात लकवा मारला असल्याचे त्यांनी मला सांगितले', अशी तक्रार महिलेने नोंदवल्यानंतर वडाळा टी. टी. पोलिसांनी पती तसेच त्याच्या कुटुंबीयांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ (कौटुंबिक हिंसाचार), कलम ५०६ (धाकदपटशा करणे) अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. त्यामुळे अटकेच्या भीतीपोटी सर्वांनी अॅड. एस. के. झेंडे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व अर्ज केला होता. 'तक्रारदार महिलेने आमच्याविरोधात खोटा एफआयआर नोंदवला आहे. आम्ही तिच्याकडे हुंड्याची कोणतीही मागणी केलेली नाही. पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे', असे म्हणणे अर्जदारांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांच्यासमोर मांडले. तर 'आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास ते पुरावे नष्ट करण्याची पूर्ण शक्यता आहे', असा युक्तिवाद सरकारी वकील कल्पना हिरे यांनी मांडला. अखेरीस 'आरोपींनी पैशांची मागणी केल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले असले, तरी नेमके किती पैसे मागितले वगैरे काहीच निश्चित विधान तक्रारीत नाही. पतीने तिच्या इच्छेविरोधात शरीरसंबंध प्रस्थापित केले म्हणजे बेकायदेशीर कृत्य केले, असे म्हणता येत नाही. आरोपींची तपासात पूर्ण सहकार्य करण्याचीही तयारी आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येत आहे', असे न्यायाधीशांनी निर्णयात स्पष्ट केले. तसेच पती व त्याच्या चार नातेवाईकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारांच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.