
गुहागर: जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील धोपावे तरीबंदर इथं शनिवारी रात्री ९ च्या सुमारास नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून १४ ऑगस्ट शनिवारी सायंकाळी त्याचा जन्म झाला आहे. शनिवारी रात्री १० च्या सुमारास गुहागर पोलीस तेथे पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे धोपावे, तरीबंदर परिसरात खळबळ उडाली आहे. गुहागर तालुक्यात अशा प्रकारे नवजात अर्भक बेवारस सापडण्याची अलीकडील काळातील ही पहिलीच घटना आहे. कसा उघड झाला धक्कादायक प्रकार? धोपाव्यातून दाभोळकडे जाणारा एक प्रवासी रात्री ९ च्या सुमारास लघुशंकेसाठी धोपावे फेरीबोट तिकीट गृहामागील शौचालयात गेला. त्यावेळी त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्याचवेळी शौचालयाच्या आजुबाजूला त्याला रक्त सांडलेले दिसले. तो प्रवासी घाबरला. ही गोष्ट त्याने धोपावे फेरीबोट तिकीटगृहातील कर्मचाऱ्यांना सांगितली. लगेचच सर्वांनी तिकीटगृहामागे धाव घेतली आणि शोधाशोध सुरू केली. तेव्हा खाडीच्या किनाऱ्यालगत असलेल्या खाजणात नवजात अर्भक दिसले. तरीबंदर मधील एका तरुणाने खाडीकिनारी उतरून सदर नवजात अर्भकाला बाहेर काढले आणि कपड्यात गुंडाळले. तसंच या बाळाला नंतर तिकीटगृहाजवळीत प्रवासी प्रतिक्षाकक्षात ठेवण्यात आले. फेरीबोट कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबतची माहिती गुहागर पोलिसांना दिली. रात्री १० वाजता गुहागरचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम महिला पोलिसांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी शौचालय परिसराची पाहणी केली. तसंच आजुबाजूच्या महिलांजवळ महिला पोलिसांनी चौकशी केली. सदर नवजात अर्भकाचा जन्म अन्यत्र झाला असावा आणि त्यानंतर अर्भकाला बेवारस सोडण्यात आले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी तपासणी केली असता नाळही तेथेच सापडली. तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासलं आहे. नवजात अर्भक हे स्त्री जातीचे असल्याने अनेक तर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.