
नवी दिल्ली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली, पण क्रिकेटबद्दल आणखी जाणून घेण्याची त्याची सवय त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे आता त्याने क्रिकेटच्या नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोचिंगच्या जगात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्याने नुकताच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि बीसीसीआयतर्फे आयोजित 8 दिवसांचा लेव्हल 2 हायब्रिड कोचिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. इरफानने शुक्रवारी (13 ऑगस्ट) त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. एनसीए आणि बीसीसीआयतर्फे ८ दिवसांच्या कोचिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक माजी खेळाडू सहभागी झाले होते. इरफानने शेअर केलेल्या फोटोत त्याचा भाऊ युसूफ पठाण, नमन ओझा, अभिषेक नायर, अशोक डिंडा, व्हीआरव्ही सिंह आणि परवेज रसूल त्याच्यासोबत दिसत आहेत. जम्मू -काश्मीर संघाचा मार्गदर्शक राहिलेल्या इरफानने एनसीए प्रमुख राहुल द्रविडचे आभारही मानले आहेत. इरफान म्हणाला की, 'एनसीए आणि बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेला लेव्हल-2 हायब्रिड कोर्स पूर्ण केल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना मी आनंदी आहे. मला आणि इतर खेळाडूंना शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल भाई आणि इतर सदस्यांचे आभार मानू इच्छितो! ही एक चालत राहणारी प्रक्रिया आहे आणि योग्य दृष्टिकोनाद्वारेच तुम्ही चांगले होऊ शकता. या कोर्सनंतर इरफान मार्गदर्शकाच्या भूमिकेत अधिक सक्रिय भूमिका बजावताना दिसेल. तरुण भारतीय क्रिकेटपटूंसाठी ही एक चांगली बातमी आहे. कारण त्यांना भारताच्या एका सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूकडून शिकण्याची संधी मिळेल.