राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना अलर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 28, 2021

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

https://ift.tt/3kO5Dlm
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे. सोमवारी मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. तसेच मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता होती. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर येथे रेड अॅलर्ट देण्यात आला होता. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाचाही अंदाज होता. मात्र राज्यभरात दिवसभरात फारशा पावसाची नोंद झाली नाही. गुलाब चक्रीवादळाचा जमिनीवर येण्याचा प्रवास संध्याकाळी उशिरा सुरू झाल्यानंतर रविवारी रात्री ११.३० वाजता जमिनीवर पूर्णपणे धडकल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. जमिनीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली; मात्र सोमवारी त्याचा प्रवास पश्चिमेकडे होत राहिला. त्यामध्ये त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामध्ये झाले. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पश्चिम किनारपट्टीवर पाऊस अधिक तीव्र असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण येथील मुख्य केंद्रांवर फारशा पावसाची नोंद झाली नाही. डहाणूमध्ये केवळ दिवसभरात २९ मिलीमीटर पाऊस पडल्याचे दिसले. मात्र तुरळक ठिकाणी विजा, गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याचे निरीक्षण नागरिकांनी सोशल मीडियावर नोंदवले. आज, मंगळवारी राज्याच्या वायव्य आणि पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बुधवारीही या पट्ट्यामध्ये ऑरेंज अॅलर्ट आहे. या पार्श्वभूमीवर विजा चमकत असताना सुरक्षित जागी राहण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.