खंडवाः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे सध्या वेगळ्याच अंदाजात दिसून येत आहेत. ते व्यासपीठावरून कधी गुन्हेगारांना इशारा देत आहेत, तर कधी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देत आहेत. खंडवामध्ये शिवराज सिंह चौहान मंगळवारी आणखी एका अंदाजात दिसून आले. त्यांनी जाहीरसभेत उपस्थित असलेल्या गर्दीलाच एक प्रश्न विचारला. सरकारच्या तिजोरित खडखडात आहे, मग उधारी घेतली तर चालेल नाही? असा प्रश्न त्यांनी केला. एका जनदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवराज सिंह चौहान हे मंगळवारी खंडवामध्ये आले होते. करोना संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. 'सध्या कडकी आहे, उधार घेतो, नंतर परत करेन यार', असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. निधी अभावी सरकारला अडचाणींचा सामना करावा लागत आहे. करोना संकटामुळे सरकारला उत्पन्न मिळाले नाही. १६ महिन्यांपैकी ८ महिने कोरडेच गेले. कारण कराचा पैसाच आला नाही. मामा ही कडकीत आहे. पण उधार (कर्ज) घ्यावं लागलं तरी चालेल, पण सर्व महत्त्वाची कामं पूर्ण करू, असं आपण ठरवल्याचं ते म्हणाले. व्यासपीठावरूनच त्यांनी जाहीरसभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना विचारलं. उधार घेऊ का? अरे घेऊ का उधार? असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसचे नेते आरोप करतात. उधार घेतल्याचा. घेतले उधार. जनतेच्या कामासाठीच तर घेतले उधार, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.