म. टा. विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री यांना दोषमुक्त करण्यात आल्यानंतर 'सत्य परेशान होता है, पराजित नही' अशी पहिली प्रतिक्रिया भुजबळ यांनी गुरुवारी व्यक्त केली. नागरिकांच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे सांगतानाच, 'तुमचा भुजबळ करू' असे म्हणणाऱ्यांनाही त्रास होणार आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देणारा निकाल दिल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया नोंदवली. महाराष्ट्र सदन प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. या प्रकरणात कंत्राटदाराला एक रुपयादेखील मिळाला नाही किंवा जमिनीचा एक फूट एफएसआयही मिळाला नाही. असे असताना महाराष्ट्र सदनातून ८०० कोटी रुपये उभे केले, यावरच ईडीचा गुन्हा असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मला त्रास देण्यासाठी आठ आठ खटले टाकण्यात आले. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ समीर आणि मला तुरुंगात राहावे लागले. या प्रकरणातून आम्हाला वगळण्यात आले, कारण आमचा काही दोष नाही हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शेवटी नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही या संकटांना तोंड दिले आणि आज दोषमुक्त झालो. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. ज्यांना उच्च न्यायालयात जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. कारण सत्य हे कोणत्याही न्यायालयात सारखेच असते, असेही ते म्हणाले. मला न्यायदेवतेने निर्दोष सोडले, पण भुजबळ करू म्हणणाऱ्यांनाही त्रास होणार आहे, असा टोला भुजबळ यांनी विरोधकांना लगावला. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आपण शरद पवार यांना भेटलो. कारण या कठीण काळात त्यांनी मला साथ दिली. 'वर्षा' बंगल्यावर त्यांची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली, असे भुजबळ यांनी सांगितले. साज़िशें लाखो बनती है... छगन भुजबळ यांनी यावेळी शायरीही केली. 'साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की... बस दुआयें आप लोगों की उन्हें मुकम्मल नही होने देती', असे ते म्हणाले. आमच्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही, असेही त्यांनी नमूद केले.