गडचिरोली: वीज पडून शेकडो शेळ्या व मेंढ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील कोरची तालुक्यात घडली. ही घटना ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कोरची तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ ते १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली नजीकच्या सावली जंगलात घडली. जिल्ह्यातील कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या चराईसाठी आणत असतात. यावर्षी सुद्धा कोरची तालुक्यात मेंढपाळाचे दोन डेरे आले आहेत. त्यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात व दुसरा डेरा सावली परिसरात असल्याची माहिती आहे. यामध्ये ७ ते ८ परिवारांचा समावेश असून जवळपास १ हजारच्या जवळपास शेळी आणि मेंढ्या घेऊन आल्याची माहिती आहे. मेंढपाळ शेळ्या आणि मेंढ्या घेऊन जंगल परिसरात असताना नऊ सप्टेंबरच्या रात्री जवळपास अकराच्या सुमारास या परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आल्याने अचानक वीज कोसळून जवळपास १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाले. यामध्ये मेंढपाळांना कुठलीही इजा झाली नसली तरी, शेकडो प्रमाणात शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्याने मेंढपाळांचे खूप मोठा नुकसान झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोरची चे तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी दोन ते तीन किलोमीटर जंगलात पायपीट करून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यावरच नेमकं किती जनावरे ठार झाली याची माहिती मिळणार आहे. मात्र, भयभीत झालेल्या मेंढपाळांनी घटनास्थळावरून डेरा दुसऱ्या ठिकाणी हलविल्याची माहिती आहे.