नवी दिल्लीः बेबी रानी मौर्य यांनी गुरुवारी उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा ( ) राजीनामा दिला. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमित सिंग यांची राज्यपालपदी नियुक्ती केली गेली आहे. त्याशिवाय तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांना पंजाबचं राज्यपाल करण्यात आलं आहे. तर आर.एन. रवी हे तामिळनाडूचे नवे राज्यपाल असतील. राष्ट्रपती भवनाद्वारे एक आदेश जारी करण्यात आला आहे. यात राज्यपालांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना नागालँडच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल ( निवृत्त ) गुरमित सिंग हे डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफही होते. मिलिट्री ऑपरेशनचे एडिशनल डायरेक्टर जनरल म्हणून त्यांनी चीनशी संबंधित प्रकरणंही हाताळली आहेत. महत्त्वाच्या बैठकांसाठी ते ७ वेळा चीनला भेटीवर जाऊन आले आहेत. त्यांनी दोन विद्यापीठांमधून एमफीलची पदवी घेतली आहे. बेबी रानी मौर्य यूपी निवडणूक लढण्याची शक्यता राज्यपाल म्हणून तीन वर्षेपूर्ण केल्यानंतर बेबी रानी मौर्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी आधी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बेबी रानी मौर्य या उत्तर प्रदेश विधानसभेची आगामी निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. त्या १९९५ ते २००० दरम्यान आग्रा शहराच्या पहिल्या महापौर होत्या.