नवी दिल्लीः काँग्रेस नेते ( ) यांनी गुरुवारी पायी चालत माता वैष्णो देवीचं दर्शन घेतेलं. यावेळी पत्रकारांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला. इथे कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही. मी इथे माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी हे आरतीतही सहभागी झाले. माता मंदिराचे मुख्य पुजारी आणि आरती पुजारीने मंत्रोच्चार म्हणत राहुल गांधींना आशीर्वाद म्हणून मातेची चुनरी भेट दिली. राहुल गांधी हे भाविकांसोबत वेगाने चालताना दिसले. त्यांनी १४ किलोमीटर चालत माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रांगेत उभे होते. मी इथे माता वैष्ण देवीची पूजा करण्यासाठी आलो आहे. यामुळे मी इथे कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. माध्यमांना तिथे कॅमेरा आणण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. काँग्रेसने राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात राहुल गांधी हे भाविकांशी बोलताना दिसले. वैष्णो देवीची यात्रा करण्याची राहुल गांधींची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, असं काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही राहुल गांधींना माता वैष्णो देवीच्या दर्शनाबद्दल विचारत होतो. पण राजकीय स्थितीमुळे ते येऊ शकले नाहीत, असं मीर म्हणाले. एएनआयने हे वृत्त दिलंय. राहुल गांधींना पायीच मंदिरात जायचं होतं आणि प्रार्थना आणि आरतीत सहभागी व्हायचं होतं. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पायीच उतरतील. त्यांची माता वैष्णो देवीवर विशेष श्रद्धा आहे. यामुळे आम्ही त्यांच्या वैष्णो देवी यात्रेच्या पहिल्या दिवशी कुठलाही राजकीय कार्यक्रम ठेवला नाही, असं मीर म्हणाले. जम्मूनंतर राहुल गांधी लडाखलाही जाणार आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा हा जम्मू-काश्मीरचा दुसरा दौरा आहे.