जम्मू काश्मीर: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच आहेत. सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान कुरघोड्या करत आहे. जम्मूच्या सतवारी भागातील फ्लाय मंडालमध्ये पाकिस्तानने पुन्हा ड्रोनद्वारे शस्त्रे फेकली आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या फ्लाय मंडाल परिसरात ड्रोनमधून एक AK-47 रायफल, नाइट व्हिजन डिव्हाइस, ३ मासिके आणि इतर स्फोटके काल रात्री ड्रोनद्वारे टाकण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ड्रोनद्वारे हे पार्सल कुणाला पाठवण्यात आले आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी संध्याकाळी जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) बंकरवर ग्रेनेड फेकला. पण या ग्रेनेड हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. ही घटना संध्याकाळी ६:५० च्या सुमारास घडली. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील केपी मार्ग येथे सीआरपीएफच्या बंकरच्या दिशेने ग्रेनेड फेकला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी माजिद अहमद नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या माजिद अहमद यांना एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसराला घेराव घातला गेला असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.