
नवी दिल्लीः काँग्रेसच्या जी -23 मधील नेत्यांनी केलेल्या चौफेर हल्ल्यांमुळे काँग्रेस हायकमांड दबावाखाली आल्याचं दिसतंय. लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची () बैठक घेण्याचं नेत्याने जाहीर केलं आहे. G-23 नेते पक्षात संघटनात्मक निवडणुकांची मागणी करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि हायकमांडवर प्रश्न उपस्थित करणारं पत्र लिहिलं होतं. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपेंद्र हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. राजकीय चर्चांमध्ये त्यांनाच जी -23 म्हटलं जातं. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. जी -23 नेते पक्षात संघटनात्मक निवडणुकांची मागणी करत आहेत. ही मागणी लक्षात घेता, काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक लवकरच बोलावण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. जी -२३ नेत्यांचा हायकमांडवर हल्लाबोल कपिल सिब्बल यांनी बुधवारी काँग्रेस हायकमांडवर घणाघाती हल्ला चढवला होता. 'मी तुमच्याशी जड अंतःकरणाने बोलतोय. मी अशा पक्षाचा आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. पण आमचा पक्ष आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मी पाहू शकत नाही, असं सिब्बल म्हणाले होते. सिब्बल यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. टोमॅटो फेकण्यात आले आणि 'गेट वेल सून कपिल सिब्बल'चे फलक दाखवण्यात आले. पण गुरुवारी जी -23 चे सर्व दिग्गज नेते सिब्बल यांच्या बाजूने उतरले. त्यांनी जाहीरपणे सिब्बल यांची बाजू घेतली. यामध्ये शशी थरूर, आनंद शर्मा, मनीष तिवारी यांसारख्या नेत्यांचा यात समावेश होता. काँग्रेसमध्ये फूट पडण्याची भीती! पक्षातील वरिष्ठ नेते आक्रमक झाल्याने काँग्रेस हायकमांड दबावाखाली आली आहे. कारण पक्षात फूट पडण्याची भीती हायकमांडला आहे. पक्षात दोन गट पडू शकतात. एक गांधी घराण्याच्या बाजून आणि दुसरा गट पक्षात सुधारणांच्या मागणी करणाऱ्या नेत्यांचा असेल. अश्विनी कुमार, अजय माकन, टीएस सिंहदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी सिब्बलवर हल्ला केला होता. टीका करणाऱ्या नेत्यांना त्यांनी गांधी घराण्याच्या केलेल्या उपकाराची आठवण करून दिली.