इंधन दरवाढ नॉनस्टॉप ! मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी केला नवा रेकाॅर्ड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 28, 2021

इंधन दरवाढ नॉनस्टॉप ! मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी केला नवा रेकाॅर्ड

https://ift.tt/3beGRpc
मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ज्या प्रकारे वाढत आहे त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी स्थानिक पातळीवर दरवाढ करत आहेत. आज पुन्हा एकदा कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले. ज्यामुळे मुंबईत पेट्रोलचा भाव ११४ रुपयांवर तर डिझेल १०५ रुपयांवर गेले आहे. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी संलग्न आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून दररोज किरकोळ इंधन दर निश्चित करावा लागतो. तूर्त कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींकडे बोट दाखवले असले तरी इंधनावर केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रचंड कराचा मोठा बोजा आहे. ज्यामुळे प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांना मोठी किंमत मोजून इंधन खरेदी करावे लागत आहे. ऐन दिवाळीत माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११४.१४ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०८.२९ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०५.१३ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०८.७८ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११६.९३ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११२.०१ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर १०५.१२ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९७.०२ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत १०१.२५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १००.१४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०६.३२ रुपये असून बंगळुरात डिझेल १०२.९२ रुपये आहे. महिनाभरात पेट्रोल ८.५० रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होत आहे. देशातील ८ राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे. दरम्यान, आज जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव २.१ टक्क्यांनी घसरला आणि ८४.५८ डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.४ टक्क्याच्या घसरणीसह ८२.६६ डॉलर प्रती बॅरल इतका झाला. उत्पादन कमी असल्याने कच्च्या तेलाचा भाव ८६ डॉलर पुढे गेला आहे. २०१४ नंतर तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.