
: घरासमोर लघुशंका का केली, याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी काही आरोपींपैकी एका महिला आरोपीला सोमवारी (२५ ऑक्टोबर) अटक करण्यात आली आहे. तिला शुक्रवारपर्यंत (२९ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. मुळे यांनी मंगळवारी दिले. या प्रकरणात जखमी सचिन काशीनाथ कावळे (२७) याची आई मीराबाई कावळे (६२, रा. गवळीपुरा, छावणी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी व शेजारी राहणाऱ्या कुसूम पोळ, अश्विनी पोळ या गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा आरोपी विजय कावळे हा दारु पिऊन फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर लघुशंका करत होता. हा प्रकार सचिनला दिसला. त्याने आरोपी विजयला याचा जाब विचारला असता त्याने सचिनला मारहाण केली. हा प्रकार पाहून शेजारच्यांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर आरोपी हा घरी गेला व चाकू घेऊन बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ आरोपीची पत्नी सपना विजकुमार कावळे (३६, रा. गवळीपुरा, छावणी) व मुलगा गुणेश हे देखील सचिनला मारण्यासाठी बाहेर आले. सपना आणि गुणेशने सचिनला मारहाण करुन पकडून ठेवले, तर विजयने सचिनवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेनंतर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता, गुन्ह्यातील पसार आरोपींना अटक करणे व गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करणे बाकी असल्याने आरोपी महिलेला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयात केली. त्यानंतर आरोपी महिलेला शुक्रवारपर्यंत (२९ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.