म.टा. प्रतिनिधी, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाचे योग्य स्पष्टीकरण न दिल्याबाबत ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दिली. अमरावतीतील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवर राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले नव्हते. ही याचिका बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असून पुढील दोन आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाने आपले उत्तर दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. यावर आयोगाने न्यायालयापुढे ही माहिती सादर केली. वर्ष २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा यांनी मर्यादेच्या बाहेर खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर या याचिकेद्वारे सुनील खराटे यांनी केला आहे. त्यामुळे राणा यांचे लोकप्रतिनिधीत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. रवी राणा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे काय झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली. यावर राणा यांना याबाबत ८ ऑक्टोबरला नोटीस बजावल्याचे आयोगाने सांगितले