
जम्मूः जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यांनी बालाकोट संदर्भात सरकारवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सरकार द्वेष पसरवत आहे, असा आरोप अब्दुल्ला यांनी केला. 'बालाकोट!... बालाकोट!... ही लाइन (LoC) बदलली आहे का? आपल्याला पाकिस्तानकडून जमिनीचा तुकडा तरी परत मिळाला का? सीमा रेषा अजूनही तशीच आहे. तिथे आपले विमान पाडले गेले. आपल्याला काय मिळाले? भाजपा पुन्हा सत्तेवर आली. भाजप आजूनही तेच करत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी द्वेष पसरवत आहेत, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये २६ फेब्रुवारी २०१९ ला दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करण्यात आला होता. भारताने पाकिस्तानसोबतची नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले. जम्मू -काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा बदला भारताने घेतला, असे म्हटले गेले. बालाकोट हवाई हल्ला लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे त्या वेळी राजकारण तापले होते आणि विरोधी पक्षांनी या हवाई हल्ल्याबाबत सरकारला घेरले होते. काही काळापासून जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहशतवादी आता बिगर काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करत आहेत. काश्मीरमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीबाबत विरोधक सरकारवर सतत हल्ला करत आहेत. जम्मू -काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काश्मीरमध्ये स्थानिक नसलेल्या नागरिकांच्या होत असलेल्या हत्या दुर्दैवी आहेत. काश्मिरींना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.