
नवी दिल्लीः पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसला बाय बाय करण्याच्या तयारीत असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे. अमरिंदर सिंग हे ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. पण नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे संतापलेल्या अमरिंदर सिंग यांनी नवी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यावरून काँग्रेस त्यांच्यावर टीक केलीय. या टीकेला अमरिंदर सिंग यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे. एवढचं नव्हे तर नवज्योत सिंग सिद्धू हे १४ वर्षे भाजपमध्ये होते. फक्त सिद्धूच नव्हे तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. यामुळे काँग्रेसने आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांनी धर्मनिरपेक्षतेच्या बाता मारू नये, असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला आहे. अमरिंदर सिंग यांनी माध्यम सल्लागार रवीन ठकराल यांच्या माध्यमातून ट्विट करून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू हे तब्बल १४ वर्षे भाजपमध्ये होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यापूर्वी भाजपमध्ये होते. पटोले आणि रेवनाथ रेड्डी हे आरएसएसमधून नाही तर मग कुठून आले आहेत? परगट सिंग हे चार वर्षे अकाली दलात होते. यामुळे काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारू नये, असं अमरिंदर सिंग यांनी ट्विटमधून म्हटलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू हे केंद्राच्या नवीन सुधारित कृषी कायद्यांशी आपला संबंध जोडत आहेत. पण गेले १५ वर्षे आपण पंजाबमध्ये पिक पद्धतीत मोठे बदल केले आहेत. तरीही आपला संबंध कृषी कायद्यांशी जोडला जात आहे. नवज्योत सिंग सिद्धू किती विश्वासघातकी आणि चालबाज आहे, हे यावरून स्पष्ट होतं. एवढचं काय तर आपण अजूनही कृषी कायद्यांविरोधात आहोत. या कायद्यांविरोधात आपण अजूनही लढतोय. त्यासाठी स्वतःचं राजकीय भवितव्य पणाला लावलं आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. केंद्रातील तीन नवीन सुधारीत कृषी कायद्यांचे शिल्पकार हे अमरिंदर सिंग आहेत. काही कॉर्पोरेट्सना फायदा पोहोचवण्यासाठी ते काम करत आहेत, असा आरोप पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. त्याला कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.