
अहमदनगर : ‘भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर धावपळ सुरू असल्याने पालकमंत्री यांनी नगर जिल्ह्यात येणं कमी केलं आहे. आता तर ते जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सोडत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना जिल्ह्यात अडवण्याच्या दिलेल्या इशार्याचेच हे फलीत आहे,’ असा दावा भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केला. ‘आता जर त्यांनी हे पद लवकर सोडलं नाही, तर आम्ही त्यांना पुन्हा नगरला आल्यावर काळे झेंडे दाखवू,’ असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या बैठकीत नगरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. नुकतेच ते नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी याला दुजोरा देत यामागील कारणही सांगितले. त्यानंतर नगरच्या पालकमंत्रिपदी कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये हे पद सांभाळलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नगर जिल्ह्यातीलच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची यासाठी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, मुश्रीफ यांच्या पद सोडण्यामागे भाजपच्या आंदोलनाचे कारण असल्याचा दावा केला जाऊ लागला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारांचा आरोप केला होता. त्यावरून आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संर्घष झाला होता. भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी मुश्रीफ यांना नगर जिल्ह्यात येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. या इशार्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही लगेच प्रत्त्युत्तर देताना मुश्रीफ यांचे नगर दौर्याच्यावेळी जंगी स्वागत करण्यात येईल, असं ठणकावून सांगितलं. त्यामुळे हा विषय चर्चेत राहिला. दरम्यानच्या काळात मुश्रीफ यांचा नगरचा दौरा रद्द झाला होता. तर एकदा ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी आले होते. दोन दिवसांपूर्वी ते नगरला आले, त्यावेळी भाजपने इशारा दिल्याप्रमाणे आंदोलन मात्र झाले नाही. अर्थात त्यापूर्वीच मुश्रीफ पद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. नगरच्या दौऱ्यात मुश्रीफ यांनी भाजपवर नेहमीप्रमाणे टीकाही केली. यासंबंधी भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले, ‘सोमय्या यांनी केलेल्या आरोपातून क्लिनचीट मिळेपर्यंत पालकमंत्रिपद सोडा नाही तर जिल्हा दौर्यात त्यांना अडवू असा इशारा आम्ही देऊन आता सुमारे तीन आठवडे झाले आहेत. या काळात त्यांनी जिल्ह्यात येण्याची हिंमत केली नाही. दोन दिवसांपूर्वी आल्यावरही पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याने आमच्या इशार्याचाच तो परिणाम आहे. मुश्रीफ नगर जिल्ह्यात काम करूच शकत नाहीत. त्यांची ती मानसिकताही नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडावे. ते त्यांनी सोडले नाही व ते जिल्ह्यात आले तर आम्ही त्यांना नक्कीच अडवू, काळे झेंडे दाखवू,’ असंही अरूण मुंडे म्हणाले.