
: दक्षिण रत्नागिरीमध्ये संगमेश्वर-देवरूख परिसरात रविवारी सायंकाळी भूकंपाचा धक्का बसला आहे. तालुक्यातील वाशी तर्फ संगमेश्वर येथील सुतारवाडी परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संध्याकाळी उशिरापर्यंत या भागात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दक्षिण भारतात भूकंपाच्या ३ आणि ४ या अत्यंत महत्त्वाच्या झोनमध्ये रत्नागिरी जिल्हा येतो. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी रत्नागिरी दक्षिण जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. चांदोली परिसर सायंकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला रत्नागिरीसह चांदोली परिसरही रविवारी सायंकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. ५ वाजून ०७ मिनिटांच्या सुमारास चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता २.९ रिश्टर इतकी नोंदवली गेली. हा धक्का अतिसौम्य स्वरूपात असला तरी परिसरात जोरात आणि अधिक वेळ जाणवला. दरम्यान, या भूकंपाची नोंद अस्पष्टपणे झाल्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे आहे, हे समजू शकलं नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.