म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोनाच्या दुसरी लाटेचा संसर्ग कमी झाला असला, तरी अद्याप शून्य ते दोन वर्षांपर्यंत लहान बालकांना श्वसनमार्गाचा संसर्ग होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. बालकांच्या श्वासनलिकेला ''च्या () संसर्गामुळे ब्रॉन्कायोलायटिसच्या आजारात वाढ झाल्याने लहान मुलांना स्पर्श करण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांमध्ये बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. मुलांमध्ये आढळणारा 'रेस्पिरेटरी सिस्टीनल व्हायरस' (आरएसव्ही) संसर्ग हा पावसाळ्यात होतो. घरातील वातावरणात झालेल्या बदलामुळे लहान मुलांमधील श्वसन प्रकरणांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशा तक्रारी बालकांमध्ये वाढल्या आहेत. 'कोव्हिड १९' चाचणी केली असता ती निगेटिव्ह येते. मात्र, लक्षणे कोव्हिडसारखीच असल्याने पालकांमध्ये भीती असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले. 'लहान मुलांच्या फुफ्फुसात श्वासनलिकांना संसर्ग झाल्यास त्याला ब्रॉन्कायोलायटिस असे म्हटले जाते. मोठ्या व्यक्तींना जसा दम लागतो; तसेच लहान बालकांना संसर्गानंतर श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात. बालकांच्या श्वासनलिकांना संसर्ग होऊन नलिकांना सूज येते. आरएसव्ही या विषाणूच्या संसर्गामुळे बालकांना ब्रॉन्कायोलायटिसचा आजार होतो. हा फुफ्फुसांचा संसर्गजन्य आजार असून दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. पावसाळा आणि हिवाळ्यात या आजाराचे रुग्ण दिसून येतात. सध्या लहान बालकांमध्ये श्वसनाचे आजार दिसत असले, तरी त्यात नॉन कोव्हिडच्या विषाणूंचा संसर्ग अधिक आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत या आजाराचा अनेक बालकांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळले आहे,' अशी माहिती मदरहूड रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी दिली. ''आरएसव्ही' संसर्ग हा जलदगतीने श्वसनमार्गामध्ये पसरू शकतो. ज्यामुळे ब्रॉन्कायोलायटीस होतो. त्यामुळे फुफ्फुसात प्रवेश करणाऱ्या लहान वायूमार्गात अडथळा निर्माण होतो. अकाली जन्मलेल्या अर्भकांसह फुफ्फुस, हृदयरोग किंवा ज्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये समस्या आढळून येते अशा बालकांमध्ये आजार दिसून येतो. हा आजार सामान्य सर्दीसारखा सुरू होतो आणि खोकला, घरघर, श्वास घेण्यास अडचण येणे ही लक्षणे एक आठवडा ते एक महिना टिकू शकतात. काहींना सायनोसिस होऊ शकतो. 'आरएसव्ही' संसर्गाची लक्षणे आणि 'कोव्हिड -१९'ची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. म्हणूनच, योग्य निदान महत्त्वाचे आहे. बाळावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नका,' असा सल्ला अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप आल्हाटे यांनी दिला. 'आरएसव्ही' संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. संक्रमण एक किंवा दोन आठवड्यांत निघून जाते. ताप, खोकला आणि सर्दीसारखी लक्षणे कमी करण्यासाठी मुलांना औषधे दिली जातील. काही अकाली जन्मलेल्या बाळांना ऑक्सिजनची तीव्र गरज पडू शकते. - डॉ. तुषार पारीख,. बालरोगतज्ज्ञ पालकांसाठी सूचना - स्वच्छता राखावी - मुलांसाठी घरात हवा खेळती असावी - बाळाचे चुंबन घेणे किंवा हस्तांदोलन करणे टाळा. - बालकांच्या जवळ जाण्यापूर्वी मास्क घाला. - बाळाला आजारी व्यक्तींपासून दूर ठेवा. - बाळाला स्तनपान द्या. - खोकताना तोंड झाका आणि बाळाजवळ शिंकू नका. संसर्गाची लक्षणे - छातीत घरघर, सर्दी होणे - धाप लागणे, कोरडा खोकला, - नाक वाहणे, चिडचिड होणे, - थकवा, ताप, शिंका येणे, डोकेदुखी