भोपाळः मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हिट अँड रनचं प्रकरणही ( ) समोर आलं आहे. बजारिया पोलीस स्टेशन परिसरातील दुर्गा मूर्तीच्या विसर्जनादरम्यान एक कार गर्दीत घुसली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी एका मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत. यापूर्वी छत्तीसगडमधील जशपूर इथेही असाच एक प्रकार समोर आला होता. भोपाळमधील रेल्वे स्थानकाजवळ बजारिया पोलीस स्टेशन परिसरात दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी गर्दी जमली होती. यावेळी अचानक एक कार गर्दीत घुसली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. कारखाली काही जण चिरडले गेले. यात एका मुलासह तीन जण जखमी झाले. विशेष म्हणजे कार चालकाने कार रिवर्स घेत गर्दीत वेगाने कार घुसवली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन ते तीन जण कार खाली आल्याचं दिसतंय. आतापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. छत्तीसगडमधील जशपूर इथे एका कारने भाविकांना चिरडलं होतं. दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवेळी भरधाव कार घुसली. अनेकांना चिरडत निघून गेली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर १० हून अधिक जण जखमी झाले. संतप्त नागरिकांनी गाडीला आग लावली. पोलिसांनी कार चालकासह दोन्ही आरोपींना अटक केली.