धक्कादायक! आठवडी बाजारात भरधाव कार घुसली: एकाचा मृत्यू; चार जण गंभीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 22, 2021

धक्कादायक! आठवडी बाजारात भरधाव कार घुसली: एकाचा मृत्यू; चार जण गंभीर

https://ift.tt/3C97gR2
: आठवडी बाजारात कार घुसल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि २१) रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे घडली. मार्कंडी शंकर मोहूर्ले (७०) रा. खेडी असं मृतकाचं नाव आहे. दशरथ कावरु रा. सिंदोळा (६०), सोमेश्वर डोमाजी मोहूर्ले (३६) रा. कापसी हे गंभीर तर कांताबाई बिबीशन कन्नाके (५३)रा. किसाननगर, छायाबाई राजू काले (५५) या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सावली इथं गुरुवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून कार भरधाव वेगाने असल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारने फळांच्या रिक्षाला धडक देऊन पाच नागरिकांना चिरडले. पाचही जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र खेडी येथील मार्कंडी शंकर मोहूर्ले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सावलीचे ठाणेदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सावलीत रस्त्यावर भरतो बाजार सावली हे तालुक्याचे ठिकाण आहे. ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजाराकरता येथे येतात. येथील आठवडी बाजार सावली-हरांबा मार्गावर भरतो. आठवडी बाजाराच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना तसंच बाजार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी याआधीही लहान-मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या नियोजित जागेवरच बाजार भरवण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.