
म. टा. प्रतिनिधी, पेट्रोलच्या दरांनी चार महिन्यांपूर्वीच शंभरी गाठल्यानंतर आता डिझेलदेखील शंभरीकडे जात आहे. या इंधनदरांनी नवी उंची गाठली आहे. यामुळे आता भाजीपाला, वस्तू महागण्याची भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक (सरकारी) क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलचे दर २५, तर डिझेलचे दर ३० पैशांनी वाढवले. यामुळे एकीकडे पेट्रोल १०८ रुपयांच्या घरात जात असताना, दुसरीकडे डिझेलने ९७.५२ रुपये प्रतिलीटरचा उच्चांक गाठला. डिझेलचे दर उच्चांकाकडे जात असल्याने आता वस्तू महागण्याची शक्यता आहे. कुठल्याही वस्तूचे दळणवळण हे वाहनाने होत असते. वस्तूंची वाहतूक करणारे सर्व ट्रक, टेम्पो, माल वाहतूक गाड्या या डिझेलवर चालतात. मालवाहतूक गाड्यांचा मायलेज हा जेमतेम १२ ते १४ किमी प्रतिलीटर असतो. आता डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतूक प्रतिलीटर १४ रुपयांनी महागली आहे. मुंबई शहर व उपनगरासह मिरा-भाईंदर, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली या सर्व भागांना दररोजचा भाजीपाला, फळ व धान्याचा पुरवठा बहुतांश नवी मुंबईहून होतो. नवी मुंबई ते या भागांचे अंतर सरासरी ५० किमी आहे. जाणे-येणे गृहीत धरून १०० किमीचा फेरा प्रत्येक वाहनांना पडतो. या १०० किमीसाठी साधारण १२ लिटर डिझेल लागते. त्यापोटी त्यांचा इंधन खर्च २०० रुपयांनी वाढला आहे. यामुळेच प्रतिनग २२ रुपये असलेले मालवाहतूक शुल्क आता २८ रुपयांहून अधिक महागले आहे. तर भाजीच्या ५० किलोच्या पोत्यासाठी आतापर्यंत वाहतुकीचा दर १५ रुपये प्रतिनग होता. तो आता २४ रुपये करण्यात आला आहे.