
मुंबई : कच्च्या तेलातील महागाईने नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला असून आज शुक्रवारी पेट्रोल दरात २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ करण्यात आली. मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. याआधी गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव ११० रुपयावर गेला होता. तर बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. मंगळवारी कंपन्यांनी वाढवला होता. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.९५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.९५ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.५८ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.४७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.३७ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.४४ रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर ९७.८४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९०.१७ रुपये आहे. चेन्नईत ९४.७४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.२७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९९.०९ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.७० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत होता. मात्र गुरुवारी त्यात किंचिंत घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा भाव ०.१२ डाॅलरने कमी होऊन ७८.५२ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव मात्र ०.२० डाॅलरने वधारला आणि तो ७५.०३ डाॅलर प्रती बॅरल झाला. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे.युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.