नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ( ) बैठक घेतली. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी अंतर्गत सुरक्षेबाबत राज्यांमधील समन्वयावर भर दिला. छोट्यात -छोट्या माहितीवर कारवाई करताना खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले, अमित शहांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. गुप्तचर विभागाच्या (इंटेलिजन्स ब्युरो) मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद आयोजित करण्यात आली होती. सीमावर्ती भागात राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. वेळोवेळी उच्च अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठका घेतल्या पाहिजेत, असं अमित शहा म्हणाले. सूत्रांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय, गृह सचिव ए. के. भल्ला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल, सीबीआय प्रमुखांसह सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख आणि केंद्रीय सुरक्षा दलांचे प्रमुख उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी अमित शहा यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवण्यावरून सुरू असलेला वाद आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. यामुळे या बैठकीला महत्त्व आलं आहे. केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करून अलिकडेच सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) ताकद वाढवली आहे. यानुसार बीएसएफला पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममधील आंतरराष्ट्रीय सीमेपासून सध्याच्या १५ किमीपासून ५० किमी परिसरात झडती, जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.