
चैत्राली चांदोरकर/ दिगंबर माने । साडे सतरा नळी सिरम कंपनीमागे गोसावी वस्ती आणि गाव देवी परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांवर मंगळवारी सकाळी अचानक बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्याला प्रतिकार केल्यावर बिबट्या जवळच्या गवताळ भागात निघून गेला. मात्र, बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत एक जण जखमी झाले आहेत. (Leopard Attack in ) वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्यात संभाजी आटोळे हे जखमी झाले असून त्यांना गालाला आणि पायाला बिबट्याचे पंजे लागले आहेत. नागरिकांनी संभाजी यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहेत. त्याच्याबरोबर असलेले अमोल लोंढे हे सुरक्षित आहेत. हे दोघे पहाटे साडेपाचच्या सुमारास गोसावी वस्तीतून जात असताना हा प्रकार घडला. बिबट्याने संभाजी यांचा पाय धरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी आरडाओरडा केल्यामुळे नागरिक जमा झाले आणि बिबट्या पळाला. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला प्रत्येक नागरिकाकडून वेगवेगळे वर्णन ऐकायला मिळते आहे. त्यामुळे हल्ला केलेला प्राणी बिबट्या होता की तरस हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमची टीम शोध घेते आहे. रेस्क्यू टीमही बोलावली आहे. पण बिबट्या ज्या भागात गेला, तिथे भरपूर गवत असल्याने लपलेला प्राणी पटकन सापडायला वेळ लागेल, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सणस यांनी दिली.