
ऋषिकेशः पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या देशातील ३५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील ३५ प्रेशर स्विंग अॅडॉप्शन ( adsorption oxygen plants (PSA) ऑक्सिजन प्लांटचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केले. देशातील एकूण १२२४ PSA ऑक्सिजन प्लांटना पीएम केअर्स फंडातून निधी देण्यात आला आहे. यापैकी आतापर्यंत ११०० PSA ऑक्सिजन प्लांट्स उभारले गेले आहेत आणि यातून रोज १७५० मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन उपलब्ध होईल. उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या एम्समध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केलं. नवरात्रीचा पवित्र सण आजपासून सुरू होतोय. पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हिमालयची मुलगी आहे. आणि आजच्या या पावन दिवशी मी इथे आहे. हिमालयाच्या या भूमीला वंदन करतो, आयुष्यात यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. २० वर्षांपूर्वी या दिवशी जनतेची सेवा करण्याची नवी जबाबदारी मला मिळाली होती. जनतेत राहून लोकांची सेवा करण्याचा माझा प्रवास अनेक दशकांपासून चालू होता. पण २० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये मला एक नवीन जबाबदारी मिळाली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपर्यंत जाईन, हा विचार मी कधीच केला नव्हता. पण २० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जनतेची सेवा करण्यासाठी मला नवी जबाबदारी मिळाली होती. मी त्यापूर्वीपासूनच जनतेची सेवा करत होतो. पण २० वर्षापूर्वी आजच्या दिवशी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची नवी जबाबदारी मिळाली होती, असं ते म्हणाले. १०८ दिवसांत देशात ११९१ पीएसए ऑक्सिजन प्लांट सुरू झाले आहेत. पीएम केअर्स फंडने मंजूर केलेल्या ११५० पेक्षा अधिक पीएसए ऑक्सिजन प्लांट्स कार्यान्वीत झाले आहेत. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पीएम केअर्स फंडअंतर्गत पीएसए ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. देशात सुमारे ४००० नवीन ऑक्सिजन प्लांट उभारली जाणार आहेत. यामुळे दुर्गम भागातही व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.