
काश्मीरः जम्मू -काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येमध्ये सामील असलेल्या एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार केले. सुरक्षा दलांना पुलवामाच्या वाहिबुग परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक उडाली. यात एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहिबुगमधील चकमक संपल्यानंतर काही वेळात श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) चा दहशतवादी तंजील अहमद याला ठार केलं. पीएसआय अर्शीद यांच्या मारेकऱ्यांचा श्रीनगरच्या बेमिना येथे सुरक्षा दलांनी खात्मा केला, असं काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं. जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मेंढर उपविभागातील नर खासच्या जंगलात दहशतवादविरोधी कारवाईच गुरुवारी संध्याकाळी लष्करातील दोन जवान गंभीर जखमी झाले. पण नंतर त्यांना वीरमरण आले. यापूर्वी १२ ऑक्टोबरला पूँछच्या सुरनकोट भागातील डेरा की गली (डीकेजी) इथे झालेल्या चकमकीत जेसीओसह लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते.