
लखीमपूर खिरीः लखीमपूर घटनेबाबत एसआयटीचा तपास अजूनही सुरू आहे. एसआयटी पथकाने गुरुवारी आरोपीला घटनास्थळी नेले आहे. मुख्य आरोपी मंत्रिपुत्र आशिष मिश्रा, अंकित दास आणि मोहम्मद आणि शेखर यांना घेऊन एसआयटी घटनास्थळी पोहोचली. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसआयटीने लखीमपूरमधील हिंसाचार घटनेप्रकरणी आरोपींकडून प्रत्येक पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी एसआयटीने या प्रकरणी आरोपींची चौकशी केली. आरोपींची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. लखनऊत होणार महापंचायत दुसरीकडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. प्रकरणी अजय मिश्रा यांना बडतर्फ आणि अटक करण्याची मागणी करण्यासाठी २६ ऑक्टोबरला राजधानी लखनऊमध्ये महापंचायत आयोजित केली जाईल, असं बीकेयूचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं. अजय मिश्रा यांना केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदावरून बडतर्फी आणि अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं राकेश टिकैत म्हणाले. भारतीय किसान युनियन २६ ऑक्टोबरला लखनऊमध्ये मोठी पंचायत घेणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना अटक करून आग्र्याच्या तुरुंगात टाकावं, अशी मागणी किसान पंचायतद्वारे करण्यात येणार असल्याचं टिकैत म्हणाले.