
जीनिव्हा : ‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन लशीला आपत्कालीन वापराची मान्यता देण्याबाबतचा निर्णय ऑक्टोबरमध्ये घेतला जाईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भारत बायोटेकने १९ एप्रिलला या लशीच्या मान्यतेसाठी अर्ज केला आहे. त्याबाबत मूल्यमापन सध्या सुरू आहे. या लशीबाबत ऑक्टोबरमध्ये निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आले आहे. ‘कोव्हॅक्सिन’बाबत सादर करण्यात आलेल्या माहितीचा अभ्यासास ६ जुलैला सुरुवात झाली आहे. या माहितीचे विश्लेषण केल्याने लशीचा आढावा घेणे शक्य होणार आहे. ही प्रक्रिया गतिमान करण्यात येत आहे. आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याची प्रक्रिया गोपनीय असते, असेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे. संघटनेने निर्धारित केलेले निकष एखादी लस पूर्ण करीत असल्यास त्या संदर्भातील माहिती व्यापकरीत्या प्रसिद्ध केली जाते, असेही संघटनेने म्हटले आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लशींचा वापर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याबाबतची सर्व माहिती आम्ही सादर केली आहे. आरोग्य संघटनेने उपस्थित केलेल्या शंकांचीही उत्तरे आम्ही दिली आहेत, आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे ट्वीट ‘भारत बायोटेक’च्या वतीने नुकतेच करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात नवे २४०० रुग्ण कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात करोनाची तिसरी लाट सुरू असून, गुरुवारी सकाळी २४०० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. एका दिवसात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यू साउथ वेल्समध्ये ९४१ रुग्णांची नोंद झाली आहे. या प्रांतात सहा मृत्यूंचीही नोंद झाली आहे. व्हिक्टोरिया प्रांतात १४३८ नवे रुग्ण आणि पाच मृत्यूंची नोंद झाली. राजधानी क्षेत्र कॅनबेरामध्ये ३१ नव्या रुग्णांची नोंद झाली. लॉकडाउन घेणार मागे व्हूंग तू : देशातील सर्वांत मोठे शहर असलेल्या हो ची मिन्ह शहरातील लॉकडाउन मागे घेण्याचा निर्णय व्हिएतनामने घेतला आहे. गेले तीन महिने शहरात निर्बंध लागू होते. हो ची मिन्ह शहराची लोकसंख्या एक कोटी आहे. हे शहर व्हिएतनामचे आर्थिक केंद्रही आहे. शहरातील व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही सुरक्षित वावराचे नियम लागू राहतील, शाळा, सार्वजनिक वाहतूक बंदच राहणार आहे. दहापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध कायम राहणार आहेत.