मुंबई : क्रिप्टो करन्सीबाबत कठोर नियमावली येण्याच्या शक्यतेने आज मंगळवारी क्रिप्टो ट्रेडर्सने जोरदार नफावसुली केली. यामुळे जागतिक बाजारात प्रमुख क्रिप्टो करन्सींच्या किमतीत घसरण झाली. आघाडीच्या १० पैकी ८ डिजिटल चलनाचे भाव घसरले. आज बिटकॉइनचा भाव जवळपास ४ टक्क्यांनी घसरला. एका बिटकॉइनचे मूल्य ५००३४९३ रुपये झाले. त्यात मागील २४ तासात ४.२० टक्के घसरण झाली. बिटकॉइनमध्ये चालू वर्षात ११४ टक्के वाढ झाली आहे. बिटकॉइननंतर दुसरा लोकप्रिय डिजिटल कॉइन असलेल्या इथेरियमच्या किमतीत मागील २४ तासात ५.७४ टक्के घसरण झाली आहे. एका इथेरियम कॉइनचा भाव ३५२९२६ रुपये इतका आहे. तिथेर या सर्वात स्वस्त असलेल्या क्रिप्टो करन्सीचा भाव ८१.०२ रुपये इतका आहे. त्यात आज १.८९ टक्के वाढ झाली. मागील २४ तासात एक्सआरपी, कार्डानो, डोजेकॉइन, बिनान्स कॉइन, पोलकॅडोट या क्रिप्टो करन्सीमध्ये देखील घसरण झाली आहे. कार्डानोचा भाव १५८ रुपये आहे. त्यात ३.१३ टक्के घसरण झाली. बिनान्स कॉइनचा भाव ५००२० रुपये असून त्यात ३.४३ टक्के घसरण झाली आहे. एक्सआरपीचा भाव ९१.७४ रुपये आहे. त्यात ४.६० टक्के घसरण झाली. पोलकॅडोटचा भाव ३४३० रुपये असून त्यात ३.२५ टक्के घसरण झाली आहे. भारतात क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता नसली तरी ही बाजारापेठ वेगाने वाढत आहे. याबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तरुणाईचा वाढत ओढा क्रिप्टो व्यवहारांची उलाढाल वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीवर कर आकारण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे.