
: अकोला खामगाव रोडवरील रिधोराजवळ असलेल्या 'ईगल इन्फ्रा' या कंपनीला भीषण आग () लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. एका डांबराच्या टाकीचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र संजय पवार आणि आतिफ खान या दोन कामगारांनी आगीत आपला जीव गमावला आहे. कशामुळे लागली आग? राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे कंत्राट 'ईगल इन्फ्रा' या कंपनीकडे आहे. राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक या कंपनीचा प्लांट आहे. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास डांबराने भरलेल्या टाकीला गळती लागल्याने वेल्डिंगचे काम सुरू होते. एकूण पाच जण या टाकीचे काम करत होते. मात्र त्याचवेळी टाकीचा भयानक स्फोट झाला आणि दुर्दैवाने यात दोन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच ३ कामगार जखमी झाले. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, पटवारी प्रशांत बुले, जुनेशहर ठाणेदार सेवानंद वानखडे, डाबकरोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे व त्यांचा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.