पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 25, 2021

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

https://ift.tt/3FKTqph
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्यातील प्राचीन मंदिरे आणि लेण्यांच्या संवर्धनाबरोबरच मंदिराच्या परिसराचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात एकविरा, खंडोबा, धूतपापेश्वर, कोपेश्वर, गोंदेश्वर, आनंदेश्वर, शिवमंदिर यांसारख्या पुरातन मंदिरासाठी आघाडीच्या वास्तुविशारदांची नेमणूक केली आहे. येत्या ३ महिन्यांत या संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानंतर मंदिर परिसराच्या विकासाच्या कामाला सुरुवात होईल. त्यासाठी आवश्यक असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे व लेण्यांचे जतन व संवर्धन करणे, प्राचीन मंदिरे आणि लेणी तसेच शिल्पे यांचे संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे तसेच राज्यातील पर्यटनाला या माध्यमातून चालना देणे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर () यासंबंधी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पाचे स्वरूप काय असावे, प्राधान्याने कोणती कामे हाती घ्यावीत, या कामांचा तपशील कसा असावा हे ठरविण्यासाठी सरकारच्या स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुर्लक्षित प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या यादीत मंदिरांचा समावेश करुन त्यांचे टप्याटप्याने काम हाती घेणे गरजेचे असल्याचे या समितीच्या बैठकीत ठरले. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने तयार केलेल्या अद्ययावत निवड सूचीतील तज्ज्ञ वास्तुविशारदांकडून कल्पना व संकल्पना मागविण्यात आल्या. त्यानंतर या सगळ्यांचे मूल्यमापन करीत सर्वोत्तम वास्तुविशारदांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या एका वास्तुविशारदास जास्तीत जास्त दोन मंदिराच्या प्रकल्पांचे काम सोपविण्याचे ठरले आहे. त्यानुसार नाशिक येथील अजिंक्यतारा असोसिएट्स यांच्याकडे गोंदेश्वर आणि खंडोबा, हरयाणातील द्रोणाह यांच्याकडे आनंदेश्वर आणि शिवमंदिर, मुंबईतील आभा नारायण लांभा यांच्याकडे धूतपापेश्वर आणि एकविरा तसेच पुण्यातील किमया यांच्याकडे कोपेश्वर आणि भगवान पुरुषोतम या मंदिरांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.