
नवी दिल्लीः केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. तसंच राज्यांना आपल्या करात कपात करण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवरी उत्पादन शुल्कात १० रुपये कपात केली आहे. यासोबतच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यांना राज्यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करून सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असं पुरी यांनी ट्विट करू म्हटलं आहे. भाजप शासित ६ राज्यांनी केली करात कपात केंद्र सरकारच्या आणि पेट्रोलियम मंत्र्यांच्या आवाहनानंतर अनेक राज्यांनी करात कपात केली आहे. विशेष करून भाजप शासित राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी इंधनावरील व्हॅटमध्ये तात्काळ ७ रुपये कपातीची घोषणा केली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनीही उद्यापासून ४ नोव्हेंबरपासून इंधनावरील व्हॅटमध्ये ७ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, इंधानावरील व्हॅट कपातीवर सरकार लवकरच निर्णय घेईल, असं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विट करून सांगितलं आहे. कर्नाटक, गोवा आणि उत्तरखंडचाही निर्णय भाजप शासित कर्नाटक आणि गोवा या राज्यांनीही इंधनावरील व्हॅटमध्ये ७ रुपये कपातीचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी व्हॅटमध्ये २ रुपये कपात करण्याचा निर्णय घोषित केला आहे.