
मुंबई : जर गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल, तर प्रत्येकाची पहिली पसंती मुदत ठेवींना (एफडी) असते. बहुतेक लोक बचत खात्यात पैसे ठेवण्याऐवजी एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) करून घेणे पसंत करतात. कारण फिक्स डिपॉझिटवरील अधिक व्याज मिळते. अशाच म्युच्युअल फंड आणि इक्विटी मार्केटपेक्षा इथे कमी व्याज मिळते, पण परतावा हमखास असतो. जर तुम्ही ३-५ वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल, तर कोणती बँक सर्वोत्तम परतावा देत आहे, हे आधी जाणून घ्यायला हवे. एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या अशा १५ बँकांबद्दल आज आपण जाणून घेऊया. यामध्ये ५ लघु वित्त बँका, ५ खाजगी बँका आणि ५ सरकारी बँकांचा समावेश आहे. याद्वारे तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची हे ठरविण्यात मदत होईल. ५ सरकारी बँका, ज्या देतात चांगले व्याज - १. या यादीत अव्वलस्थानी आहे, युनियन बँक ऑफ इंडिया, जी ५.४ टक्के परतावा देत आहे. २. या यादीत दुसऱ्या स्थानी आहे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, जी ५.३ टक्के व्याज देत आहे. ३. पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एफडीवर ५.३ टक्के व्याज मिळत आहे. ४. त्यापाठोपाठ येते पंजाब नॅशनल बँक, जिथे एफडीवर ५.२५ टक्के परतावा दिला जात आहे. ५. इंडियन ओव्हरसीज बँकेत ५.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. ५ खाजगी बँका पुढीलप्रमाणे - १. आरबीएल (RBL) बँक ६.३० टक्के व्याज देत आहे. २. येस बँकेत एफडी केल्यास ग्राहकांना ६.२५ टक्के व्याज मिळू शकते. ३. इंडसइंड बँकेत एफडी करून तुम्हाला ६ टक्के व्याज मिळू शकते. ४. तुम्ही डीसीबी बँकेत एफडी केल्यास तुम्हाला ५.९५ टक्के व्याज मिळेल. ५. अॅक्सिस बँकेत एफडीवर ५.४० टक्के व्याज मिळते. ५ लघु वित्त बँका देतात जोरदार व्याज १. जन स्मॉल फायनान्स बँकेतही एफडीवर ६.७५ टक्के व्याज दिले जात आहे. २. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ६.५० टक्के व्याज देत आहे. ३. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत एफडीवर ६.५० टक्के व्याज दिले जात आहे. ४. जर तुम्ही फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत एफडी केली, तर तुम्हाला ६.५० टक्के व्याज मिळेल. ५. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत एफडीवर ६.२५ टक्के व्याज मिळेल.