
सीए संजीव गोखले, मुंबई : विभागाकडून वेळोवेळी करदात्यांना नोटिसा पाठवल्या जातात. प्रत्येकवेळी पाठवण्यात येणाऱ्या नोटिसीमागे काहीएक कारण असते. नेहमीच करदात्याला त्रास देण्याचा उद्देश असतो हा समज चुकीचा आहे... कलम १४२(१) नोटीस : मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करताना प्राप्तिकर अधिकाऱ्याला काही माहिती, पुरावे हवे असल्यास या कलमांतर्गत नोटीस पाठून तो मागवू शकतो. या नोटिशीकडे दुर्लक्ष न करता मागितलेली माहिती ऑनलाइन पद्धतीने वेळेत पाठवणे महत्त्वाचे आहे. कधी कधी विवरणपत्र भरले नसेल व अधिकारी आपल्या उत्पन्नाचे मूल्यांकन करू इच्छित असेल तरी अशी नोटीस पाठवतो व विवरणपत्र सादर करा असा आदेश देतो. अशावेळी ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन विवरणपत्र सादर करावे. तसे न केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. कलम १४८ पुनर्मूल्यांकन नोटीस : प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे जर ठोस पुरावे असतील की विवरणपत्रात संपूर्ण उत्पन्न दाखवले गेलेले नाही तर तो या कलमांतर्गत नोटीस काढून विवरणपत्राची पुन्हा तपासणी करू शकतो. ही प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यासमोर आता जावे लागत नाही. जर पुनर्मूल्यांकनात असे सिद्ध झाले की करदात्याने उत्पन्न दाखवलेले नाही, तर कर, व्याज व दंड लागतो. या नोटिशीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कलम २४५ अंतर्गत नोटीस : एखाद्या वर्षासाठी प्राप्तिकराचे देणे बाकी असेल व पुढील वर्षामध्ये परतावा निश्चित झाला असेल तर प्राप्तिकर विभाग ही नोटीस धाडतो. या नोटिशीद्वारे करदात्यास सूचित केले जाते की जुने येणे बाकी आहे, ते या परताव्यासमोर वर्ग करून घेतले तर आपली काही हरकत आहे का? या नोटिशीला ३० दिवसांच्या आत ऑनलाइन पद्धतीने उत्तर देणे अपेक्षित आहे. जर जुने देणे भरले असेल किंवा त्यासमोर न्यायालयात अपील प्रलंबित असेल तर प्राप्तिकर खात्याला तसे कळवणे जरुरीचे आहे. असे काहीच कळवले नाही तर मात्र प्राप्तिकर विभाग परताव्यासमोर जुने येणे वर्ग करून उरलेला परतावा बँकेत पाठवेल. कलम १३९(९) अंतर्गत सदोष विवरणपत्र नोटीस : भरलेले विवरणपत्र अपूर्ण असेल किंवा काही रकाने चुकीचे भरले गेले असतील, तसेच करकपात झाली असूनही संबंधित उत्पन्न दाखवले गेले नसेल, व्यावसायिक करदात्यांकडून नफातोटा पत्रक वा ताळेबंद सादर केला गेला नसेल किंवा इतर काही चुकीचा तपशील आढळल्यास प्राप्तिकर अधिकारी नोटीस पाठवून १५ दिवसांच्या आत दोष सुधारून पुन्हा विवरणपत्र सादर करण्याची विनंती करतो. करदात्याने सादर केलेल्या विवरणपत्रातील चूक सुधारून वेळेत ते सादर करावे. जर काही कारणांनी १५ दिवसांत तसे करणे शक्य नसेल तर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे वेळ वाढवून मागावा. मात्र दोषनिवारण केले नाही तर विवरणपत्र रद्दबातल होते व विवरणपत्र भरलेच नाही असे समजण्यात येते व पुढील कारवाई केली जाते. या सगळ्याचा विचार करू प्रत्येक करदात्याने प्राप्तिकर विभागाकडून आलेली नोटीस नीट वाचून त्याप्रमाणे उत्तर देणे अपेक्षित आहे. यात एक महत्त्वाची बाब म्हणजे ई-फायलिंग पोर्टलवर करदाते सर्व प्रकारच्या नोटिसा पाहू शकतात व तेथूनच त्यांना उत्तरेही देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आलेल्या मेसेज किंवा मेलवरील कोणत्याही लिंकवर क्लिक करून उत्तरे देऊ नका. कदाचित या लिंक खोट्याही असतील व आपले नुकसान केले जाऊ शकते. आपला परतावा तयार आहे आपण काही माहिती द्या अशा पद्धतीचे मेसेज किंवा मेल आले तर त्यांना उत्तरे देऊ नका. प्राप्तिकर खात्याच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन खात्री करून मगच पुढील कार्यवाही करावी.