
लेहः १९६२ च्या युद्धात भारतीय जवानांनी चिनी सैनिकांची दाणादाण ( 1962 sino-indian conflict ) उडवली होती. रेझांग-लामधील हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांनी चिनी सैनिकांची दैना उडवली होती. भारत-चीन युद्धात कुमाऊँ रेजिमेंटचे मोठे योगदान होते. या रेजिमेंटने चिनी सैनिकांना जोरदार टक्कर दिली. याच रेजिमेंटचे ब्रिगेडियर आर. व्ही. जटार (निवृत्त) यांनी या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवले होते. रेझांग-ला येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नूतनीकरण केलेल्या रेझांग ला वॉर मेमोरियलचे लोकार्पण केले. यापूर्वी राजनाथ सिंह यांनी स्वतः ब्रिगेडियर जटार यांना व्हीलचेअरवरून स्मारकापर्यंत नेले. १९६२ च्या भारत-चीन युद्धा १३ कुमाऊँचे ब्रिगेडियर आर. व्ही. जटार यांनी धैर्याने लढा दिला. चीनबरोबरच्या युद्धाच्या वेळी जटार हे कंपनी कमांडर होते. चिनी सैनिकांविरुद्ध त्यांनी प्राणपणाने लढा दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिग्रेडियर यांना स्वतः एस्कॉर्ट केले आणि म्हणाले, जटार यांच्या शौर्याला मी नमन करतो. रेझांग-लामध्ये भारताच्या ११४ जवानांनी १२०० हून अधिक चिनी सैनिकांना ठार केले होते. या जवानांना मी नमन करतो. ही काही छोटीशी गोष्ट नाही. जोपर्यंत मी संरक्षण मंत्री आहे. तोपर्यंत येथे शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी येत राहणार, असे राजनाथ सिंह म्हणाले. १८ हजार फूट उंचीवर भारती जवानांचे शौर्य १९६२ भारत-चीन युद्धात १८,००० फूट उंचीवर भारतीय जवानांनी शौर्य आणि पराक्रमाची गाथा लिहित आपले सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय जवानांनी अखेरच्या क्षणापर्यंत चिनी सैनिकांना रेंझाग-ला पोस्ट ताब्यात घेऊ दिले नाही. उणे तापमान आणि रिकाम्या हातांनी चिन्यांना शिकवला धडा मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखालील १३ कुमाऊँ बटालियनच्या चार्ली कंपनीने हाडं गोठवणाऱ्या थंडीत चिनी सैनिकांना दणका दिला. या युद्धात मेजर शैतान सिंग यांच्यासह अनेक भारतीय जवान शहीद झाले. मात्र, शहीद होण्यापूर्वी भारतीय जवानांनी अनेक चिनी सैनिकांना ठार केले होते. दारूगोळा आणि काडतुसं संपल्यानंतर भारतीय जवान रिकाम्या हाताने चिनी सैनिकांशी भिडले. भारतीय जवानांनी चिन्यांना रायफलच्या बटने मारले आणि त्यांचे मोठे नुकसान केले होते.