जिल्हा बँक निवडणुकीत बड्या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, कोण राखणार राजकारणात वजन? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

जिल्हा बँक निवडणुकीत बड्या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, कोण राखणार राजकारणात वजन?

https://ift.tt/3DepaT1
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जिल्ह्यातील प्रमुख नेते बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, साताऱ्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्यामुळे या ठिकाणी निवडणूक लागली आहे. विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून कराड तालुक्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उदयसिंह उंडाळकर पाटील हे निवडणूक लढवत असून उदयसिंह उंडाळकर काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री विलास काकांचे पुत्र आहे. त्यामुळे उंडाळकर गटाचा तसेच कराडमधील राजकारणातील मातब्बरांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. यामुळे बाळासाहेब पाटलांचा मार्ग खडतर मानला जातो. दुसरीकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सुद्धा पाटणमधून तगडा उमेदवार समोर ठाकला आहे. शरद पवारांचे जिल्ह्यातील अत्यंत विश्वासू आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला. मंत्री शंभूराज देसाई यांना विजय मिळवायचा असेल तर जिकिरीचे प्रयत्न या ठिकाणी त्यांना करावे लागणार आहेत. राष्ट्रवादीचेच माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज भरला असून कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शशिकांत शिंदे यांना जिल्ह्याच्या राजकारणात वजन राखायचं असेल तर कोणत्याही प्रकारे या ठिकाणी विजय मिळवावा लागेल. आजी आणि माजी मंत्र्यांच्या प्रतिष्ठेच्या झालेले ह्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असुन. यामध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे